पक्षी तज्ञ श्री पुरी सर यांचा इंद्रायणी माळच्या परिसरातील पक्षी निरीक्षण केलेला लेख...
माळाला गवसणी घालणारी रानपाखरं पाहून वसंतोत्सवातील झाडासारखीच मनालाही पालवी फुटायची. आकाशाच्या निळाईतून बागडणारी ही रानपाखरं काव्यचित्राचं रूप घेऊन मनात रेंगाळत. पाखरांच्या आवाजाचे रंग कागदावर हळूवार उतरत. उतारावरची झाडं अन् झाडावर उतरणारी पाखरं एखाद्या द्विमिती चित्रासारखी शोभून दिसायची. रेखाटलेल्या निसर्ग चित्रापेक्षाही अनुभवलेला निसर्ग काकणभर अधिक सुंदर असतो हे कळू लागलं. माळरानावरील रानवाटा रानपाखरांच्या घरट्याचा रस्ता दाखवित. मातीच्या गर्भातून रानवेल वाढत जावी तशी गवताच्या कुशीतून पाखरांची वंशवेल वाढत जाई. रानपाखरांचे जन्मसोहळे पाहण्यासाठी रानफुलांची झुंबड उडे. 'चंडोल' पक्ष्यांच्या पिलांना पाहण्यासाठी पिवळ्या रंगांची फुलपाखरे भिरभिरताना दिसत.
'इंद्रायणी नदी'चं बाळसं रूप न्याहळणारी माळावरची झाडं किती भाग्याची ! त्यांना सुख-दुःखाच्या गोष्टी सांगणाऱ्या रानपाखराची दमछाक व्हायची. जरी झाडांचा पाय उचलत नसला तरी शिवारातील गुजगोष्टी पाखरामुळं कळायच्या. घरातल्या मूळ पुरुषासारखा भलामोठा कडुलिंब त्या माळावर पाय रोवून उभा आहे. आजोबाच्या हातात काठी यावी तसा तो सुद्धा वाकत चाललाय. पायथ्याची हिंगणबेटाची झाडं कडूलिंबाकडं पाहतच लहानाची मोठी झालेली. हेकळणी स्वतःपुरतंच सावरून बसलेल्या. परंतु वडाची झाडं सगळ्यांना मायेचं पांघरुन घालणारी. म्हणून ही झाडं दीर्घायुषी असावीत. या झाडांची रसरसीत रसाळ फळं चाखणारी रानपाखरं किती आनंदात दिसायची.
कडुलिंबाच्या लिंबोळ्या चाखणारे 'कावळे'. वडाची रसाळ फळं चाखणारे 'तांबट' आणि 'हरोळ्या'. पळसाच्या फुलांभोवती रेंगाळणाऱ्या 'पळसमैना'. सरड्याचा पाठलाग करणारे 'खाटीक'. गवताच्या बिया भरडून खाणाऱ्या 'मुनिया'. घाणेरीच्या झाडातून डोकावणारे 'बुलबुल'. गवतात नाचणाऱ्या 'सुगरणी'. खुरट्या गवतातून कीटकांचा वेध घेणारे 'चंडोल'. झुडपात अंग चोरून बसणारे 'तित्तिर'. पायथ्याला मिलनासाठी उत्सुक असलेले 'कांडीमार'. उंच झाडावरचे 'शेराटी'. बांबूच्या झाडातून ये-जा करणारे 'वेडे राघू' देवीच्या मंदिराभोवती 'पोपटांचा' तांबडा किलकिलाट. झुडपातल्या घरट्यात अंड्यावर बसलेली 'रंगीत रायमुनिया'. माळाला जाग आणणारे 'कोंबडे'. पळसाच्या झाडाला घरटी बांधणाऱ्या शेकडो 'सुगरणी'. चिमणी, होला, मोर, लांडोर, साळुंकी, भारद्वाज, भांगपाडी मैना, पारवा, कोतवाल, बगळा, हुदहुद्या, वटवट्या या पाखरांवर मायेचं पांघरुन घालणारी माळावरची झाडं. इंद्रायणी माळ म्हणजे पाखरांचं निवासस्थान. माळावरची झाडं म्हणजे पाखरांच्या घरा-दाराची आगळच!
पावसाळी दिवसात पाण्याचं ओझं घेऊन पळणाऱ्या ढगांच्या रांगा थोडा वेळ विश्रांतीसाठी या माळावर उतरतात. या ढगांच्या राशी म्हणजे समुद्री पक्ष्यांच्या आणि माळरानावरील पक्ष्यांच्या सुख-दुःखाच्या गोष्टी वाहून नेणारे दुतच! या रानपाखरांचा निरोप घेऊन ढगांच्या रांगा इंद्रायणी नदीच्या पात्रावरून पुढं सरकतात. माळावरची झाडं पावसाच्या आशेवर अन् पाखरांच्या भरवशावरच वाढतात. ही झाडं काही ठिकाणी मेळावा भरल्यासारखी दाटीवाटीनं उभी दिसतात.
या माळावर गुलाबी आणि तांबडी घाणेरी रुजलीय. इतर ठिकाणी अनेक रंगांची सरमिसळ असलेली घाणेरीची फुलं पाहायला मिळत. परंतु येथे गुलाबी रंगाच्या विविध छटा एकाच फुलात अनुभवता येतात. या वनस्पती 'बुलबुल' पक्ष्याला आकर्षित करतात. घरट्यासाठी जागा पुरवितात. या पाखरामुळे घाणेरी हात-पाय पसरू लागलीय. अर्जेंटिनामधील मुंग्यांच्या महासमाज वारुळासारखं घाणेरीसुद्धा जमीन पादाक्रांत करत आहे. माळावर पाय ठेवण्यासाठी काही झाडांना संघर्ष करावा लागतो. परंतु ही घाणेरी कोणालाही न घाबरता मोकाट कुत्र्यासारखी पिलावळ वाढवीत चाललीय. मला वाटतं सगळी झाडं गुण्यागोविंदाने नांदावीत. संयुक्त कुटुंबासारखीच.
माळावरचे 'खाटीक पक्षी' पायथ्याच्या काटेरी झाडावर हमखास दिसत. इंद्रायणी नदीच्या उगमाकडची विरळ झाडं त्यांना खुणावत असत. सहसा कुणालाही न आवडणारी झाडं त्यांच्या आश्रयाच्या जागा. 'राखाडी रंगाचा खाटीक' आणि 'रंगीत खाटीक' द्वारपालासारखे माळाच्या पोटाला झाडावर बसून टेहळणी करत असल्याचा भास होई.
'तांबट', 'धोबी', 'शिंपी', 'सुतार', आणि 'खाटीक' अशी काही पक्ष्यांची व्यवसायवाचक नावं पडलेली. त्यांच्या आचरणातून ही नावे दिलेली असावीत असं मला वाटतं. 'तांबट' पक्षी घरट्यासाठी खोडावर भांडे बडविल्यासारखा आघात करतो. गावात आलेला 'तांबटकरी' शाळेजवळच्या वडाखाली बसून भांडे बडविताना दिसायचा. 'शिंपी' पाखराच्या घरट्याचा इतिहास मानव जातीतील शिंप्याच्या दारावर धडका घेतो.
गावातील अलुतेदार-बलुतेदार पूर्वीसारखे दिसत नाहीत. सगळ्यांचा व्यवहार पैशावर चालतो. त्यांच्यातलं भावनिक नातं संपुष्टात आलय. सुतार, लोहार, कुंभार, शिंपी, न्हावी, जोगी, गोसावी ही माणसं गावगाड्यात राहायची. ज्वारीच्या पेंडीचा पिळ गळून पडावा तशी सगळी माणसं विस्कटून गेली. मला पक्ष्यांच्या व्यवसायवाचक नावांची भूरळ पडलेली. मी त्याचा शोध घेऊ लागलो. आर्वी गावापासून इंद्रायणी माळापर्यंतचा रस्ता ओळखीचा झालेला.
राखाडी खाटीक पक्ष्याला बोरीच्या फांदीवर बसून सरड्यावर ताव मारताना पाहिलय. अर्धवट खाऊन उरलेलं अन्न फांदीवरच लटकवून ठेवलं. या पक्ष्याच्या आठवणी इंद्रायणी नदीच्या पाण्यात वाहत येत. वाहतं पाणी वाळूखाली दबून बसतं तशा या पाखरांच्या भेटी-गाठी कमी होत. तो रुचकीच्या झाडावर बसून कीटकांचा पाठलाग करी. पायवाटेवरची अशी झाडं ओळखीची झालेली. पेटीत जपून ठेवलेल्या आवडत्या वस्तूसारखीच या पाखरांंची आठवण येते.
रात्री पाऊस झालेला. पहाटे माळाच्या दिशेने निघालो. हवेतला गारवा वाढत चाललेला. सूर्यरथाचे घोडे अंधाराला ढकलीत पुढं पळाले. पाखरांच्या आवाजानं झाडांचा तरतरीतपणा जाणवत असे. रानपाखरांच्या संगीतामुळे झाडेही सुखावतात हे सर्वश्रुत आहेत. ही गोड गळ्याची पाखरं माझ्या आयुष्यात आनंद पेरीत गेली. उद्याच्या सुंदर दिवसासाठी या पाखरांनी फळाला चोच लावावी असं झाडांनाही वाटतं. पाखरं झाडांच्या बिया पेरीत जातात. त्यांनी पेरलेल्या बिया हमखास रुजतात.
मांडाखळी, बाभुळगाव, डफवाडी, उमरी, भोसा, लोहरा, जंगमवाडी आणि पिंपळा या गावांच्या मधोमध असलेला इंद्रायणी देवीचा माळ सर्वांना खुणावतो. बैलगाडीनं जाताना पाखरांची बहुविविधता अनुभवता येते. मळलेली पायवाट सोडून आत गेलं की पाखरे बोलत बसलेली दिसत. दादा-दादी फार्मला गवसणी घालणारी ही रानपाखरं डोळ्यापुढं भिरभिरत.
'कांडीमार' पक्ष्याच्या थव्यानं मला आकर्षित केलं. मादीला आकर्षित करण्यासाठी त्यांची चढाओढ लागलेली. पाच-सहा नर प्रतिस्पर्ध्यासारखी एकमेकांसमोर उभी रहायची. त्यांच्या गळ्याखाली असलेला काळसर फुगा फुगवायचे. तो जमिनीपर्यंत आल्याचा भास होई. पुन्हा गळ्याजवळ थांबे. आकुंचन आणि प्रसरण ही क्रिया सुरू होती. परंतु मादीचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. हळूहळू सर्व नर मादीभोवती रेंगाळत. मला वाटतं पक्षीजगतातलं हे 'स्वयंवरच' असावं. त्या पाखरांची भाषा मला कळत नव्हती. परंतु त्यांच्या नैसर्गिक हालचालीमधून त्यांचं भावविश्व डोळ्यापुढं तरळत होतं.
काही दिवसांनी त्याच परिसरात 'कांडीमार' पक्ष्याची जोडी फिरताना दिसायची. एकमेकासमोर उभे राहून हितगुज करायची. त्यांच्यातला प्रेमभाव पाहून मला ओशाळल्यासारखं व्हायचं. पाणवठ्याच्या शेजारी जोडीने फिरत. जणू एखाद्या सिनेमातील नायक- नायिके सारखं दृश्य निसर्गाच्या उघड्या पडद्यावर अनुभवत होतो.
आकाराने मोठे असलेले पक्षी. तांबूस काळसर पाय. दुरूनही त्यांना सहज ओळखता येतं. गळा लिलीच्या फुलासारखा पांढराशुभ्र. काळ्या पाषाणासारखे डोळे. काळसर चोच भक्ष्याला पकडण्यासाठी सदैव तत्परच. हवेवर स्वार होण्यासाठी पायाची गती वाढवितात. जणू ढांगा टाकतच पुढं चालतात. म्हणून त्याला काही लोक 'ढंगाळ्या' म्हणत असावेत. 'कामऱ्या ढोक', 'चिमणा ढोक', 'कांडेसूर' अशा नावानेही ओळखतात. कापसाच्या शेतात अलगदपणे उतरतात. पावसाळी दिवसात या पक्ष्यांच्या येण्यानं इंद्रायणी माळाचा परिसर आनंदून जातो. माळाच्या अंगाखांद्यावर खेळणारी पाखरे दुपारच्या वेळी मनाच्या सावलीत आराम करत.
पक्षीनिरीक्षणासाठी इंद्रायणी माळाच्या परिसराला मी माझ्या सोयीसाठी काही नावं दिलेली. त्यातलं एक म्हणजे 'टेबल पॉईंट'. या सपाट भागावर 'चंडोल' पक्ष्यांच्या हालचाली डोळ्यांनी सहज टिपता यायच्या. 'लालपंखी चंडोल' आणि 'तुरेवाला चंडोल' गवतातून डोकावत. गवत वाढत जातं तशी त्यांच्या घरट्यांची संख्याही वाढत जाते.
'तुरेवाला चंडोल' काही अंतरावर दिसला. तो गवतात काहीतरी शोधत होता. त्याचा तुरा गवतातून बाहेर येई. त्याची घरट्यासाठी शोधाशोध सुरु असावी. कधी दगडाच्या आड लपून बसे. माझी चाहूल लागताच काही अंतरावर स्वतःला लपवून घेई. 'लालपंखी चंडोल' पक्ष्यांचा थवा त्या गवतातून पुढं सरकत असे. जणू हिरव्या पडद्यासमोर मुकाभिनय चाललेला.
टेबल पॉईंटची दक्षिण बाजू उतरती. समोर हरणांचे कळप चरताना दिसत. काळवीट आपल्यावर लक्ष ठेवी. कुठं-कुठं काळविटांची शिंगं गळून पडलेली किंवा सत्तांतरात मोडलेली आढळून येत. या आयताकृती परिसराच्या मधोमध एक उंच वाढलेलं पळसाचं झाड आकर्षित करतं. खुरट्या घाणेरीमधील 'बुलबुल' पक्ष्यांची घरटी पाहिलेली. परंतु या पळसाच्या फांदीवर एका बुलबुल पक्ष्याच्या जोडीने मोठ्या वाटीच्या आकाराचं घरटं विणलेलं पाहायला मिळालं.
बुलबुल पक्ष्यांना फुलपाखरांचा पाठलाग करून त्यांना फस्त करताना पाहिलय. पिलांना भरवताना त्यांची धांदलघाई असते. टेबल पॉईंटची उत्तरेकडची बाजू या पाखरांना आंदण म्हणून मिळालेली. या पाखरांच्या शेपटीखालची लाल पिसं ओळखण म्हणून उपयोगी पडणारी. खरं तर पाखरांची रंगीत पिसं त्यांच्या सौंदर्यात अधिकच भर घालायची.
"तीळ, डोळे, मोड, मोती, खरूज, खपली, कान, कानठाळी एक रुपयामधी वर्षाची पिडा घ्या आईला वाहायला". या आवाजानं नवरात्र उत्सवात माळरानाला जाग येते. भक्ताच्या हाकेला धावणारी इंद्रायणी देवी या माळावर वास करते. या इंद्रायणी देवीच्या नावावरून या माळाला 'इंद्रायणी देवीचा माळ' म्हणून ओळखले जाते. हा माळ सर्व पशुपक्ष्यांना पंखाखाली घेऊन वाढवितो.
पायथ्यालगत साचलेलं पाणी पाखरांना बोलवतं. त्या पाखरांच्या पायांची नक्षी ओलसर भूमीवर उमटत असे. ती नक्षी गंधहीन पद्मपुष्प वाटायची. बगळे, ढोकरी यांच्या पाऊलखुणा मागं विसरून गेलेल्या. कुठं-कुठं रानडुकरांच्या खुऱ्या उमटलेल्या. माती उकरलेली. तिथं त्यांच्या अंगावरील केस गळून पडलेले दिसायचे. बिळासमोर 'साळींदर' प्राण्यांचे काटे गळून पडावे तसं काहीसं दृश्य होतं. पाणी पिण्यासाठी येताना प्राण्यांची एक विशिष्ट पायवाट असते. तशा खुणा या माळावरच्या उतारावर आढळत. त्या हरणांच्या सगरी होत्या. प्रत्येक प्राण्याची पाणी पिण्याची ठराविक वेळ असते. रानडुक्कर, हरिण, काळवीट, नीलगाय, वानर, कोल्हे यांच्या अस्तित्वाच्या खुणा या परिसरात अनुभवायला मिळत.
दरवर्षी माळावरचे पळस फुलू लागले की मी घरातून बाहेर पडे. उत्तरेकडून हिमालयाच्या आठवणी घेऊन येणाऱ्या पळसमैनेची भेट होई. पळसाच्या शेंड्यावरची पानं गळू लागत अन् मेहंदी रंगाच्या कळ्या पळसमैनेची वाट पाहत. पाकळ्यांनी माना बाहेर काढल्या की, फुलातील मकरंद चाखायला या पाखरांची झुंबड उडत असे. दिवसभर चक्-चक्, चक्-चक् आवाज करत झाडावरच रेंगाळत. पळसाच्या फुलांतील मकरंद चाखत कोल्हापूरात गेलेल्या पैलवानासारख्या धष्टपुष्ट होत. सायंकाळी आकाशाच्या पोकळीत त्यांच्या कसरती डोळ्यांना विसावा घेऊ देत नसत. 'पाखरांचा गाव-कुंभारगाव' या परिसरातही या पळसमैना पर्यटकांना आकर्षित करायच्या. रानातली दुधाळ ज्वारी खाण्यासाठी हमखास उतरत. पळसमैना अनेक देशांच्या सीमा ओलांडून भारतभर वावरते. स्थानिक पक्षी त्यांचा स्विकारही करतात. पण तसं माणसाला अजून जमलं नाही. देशोदेशीच्या सीमा फक्त माणसापुरत्याच मर्यादित.
मावळतीकडे झुकलेला सूर्य पाहून अंधाराची पावलं माळाच्या पायथ्याला एकवटत असत. तित्तिर पक्षी कुबड्या कडूलिंबाच्या फांदीवर बसून आकाशाकडे तोंड करून घसा मोकळा करायचा. अजूनही काही बुलबुल गवतातून किड्यांचा पाठलाग करताना दिसत. सुगरणी अंगणात बसून दिवसभराच्या गोष्टी करत असल्याचा भास होई. अंधार कासवाच्या गतीनं माळाच्या वरच्या दिशेनं सरकत असे तेव्हा सुगरणी घरट्यात प्रवेश करत. आकाशात घिरट्या घालणारी 'घार' दिसेनाशी होई.
'इंद्रायणी' नदीच्या उगमाजवळची पळसाची झाडं 'सुगरण' पक्ष्याला माहेराहून मिळालेल्या वस्तूंसारखीच आंदण म्हणून मिळालेली. पावसाळी दिवसात या पाखरांचा आवाज नदीतील पाण्यासारखाच ओसंडून वाहतो. त्यांच्या आवाजानं नदीसह इंद्रायणी माळालाही नवीनता मिळालेली. पळसाची झाडं मूठभर मास चढल्यासारखीच मान ताठ करून सगळा परिसर एका दृष्टीक्षेपात सामावून घ्यायची. या झाडांच्या फांदीला सुगरणीची घरटी झुलू लागत. गवताच्या पात्यापासून विणलेली घरटी पाहून मनातला मोर केकावल्या देत नाचत राहायचा. जशी फुलांभोवती फुलपाखरे भिरभिरतात. तसा मी सुद्धा या घरट्याभोवती रेंगाळत असे. चातकाचं पावसाशी असलेलं नातं एकजीव असतं. तशी सुगरणीची पळापळ रानगवताशी एकरूप व्हायची.
'सुगरण' दिसायला 'चिमणी' सारखीच. पोटाशी पांढरट रंग. चोच थोडीशी जाड. शेपूट आखूड. डोक्यावर पिवळी पिसे. विणीच्या काळात विविध रंगछटा दिसू लागत. पिवळ्या रंगानं माखून गेलेली नर-मादी नवरा-नवरी सारखी शोभून दिसत. त्यांच्या चिट् चिट् चिट् या आवाजानं सगळा परिसर आनंदून जायचा.
माळाच्या पोटाला वाढलेली काटेरी झाडं या पाखरांना घरट्यासाठी जागा पुरवित. बाभूळ, बोर ही झाडं जणू त्यांच्याच मालकीची. कडुलिंब, शेवरी, पळस, विजेच्या तारा, विहीरीच्या काठावरची झाडं या जागाही त्यांच्या आवडीच्या. नारळाच्या झाडावरची त्यांची घरटी अन् त्यातून डोकावणारी पिलं दाराआड लपणाऱ्या मुलांसारखीच! रानावनात दिसणारी सुगरण गावालगतच्या झाडांवरही सुखानं संसार थाटते. नव्यानं शहरात गेलेल्या एखाद्या जोडप्यासारखी.
नवी पहाट नवा अनुभव घेऊन जन्मास येते. तशी सुगरण मानवी जीवनात डोकावते. विणीच्या काळात सौंदर्याचं लेणं पांघरलेली सुगरण घरातल्या सुगरणीपेक्षा वेगळी कधीच नसते. तिच्या पसंतीला उतरलेलं घरटं इवलूशा चोचीने विणायला सुरूवात करते.
जसं 'पीटर स्कॉट' या पक्षीशास्त्रज्ञानं रानबदकाची अप्रतिम रेखाटने चितारली आहेत. तसं इंद्रायणी माळावर सुगरणीची आणि पळसमैनेची रेखाटने काढता येतात. पावसाळा 'सुगरण' पक्ष्यांच्या विणीचा हंगाम. काटेरी झाडासह पळसाच्या झाडावरही या पाखरांची घरटी झुलू लागत. काही पळसाच्या फांदीला दोन मजली घरटी वाऱ्यावर हेलकावे घेताना पाहायला मिळतात. जशी काही गावात जुळी भावंडं जन्माला येतात तसंच इथं दुमजली घरटी पाहणं खूप आनंददायी असतं. झाडाचा मांडव हळद लागलेल्या सुगरणीला जागा पुरवितो. तिची पिलं या मांडवाच्या आश्रयानं वाढलेली. पंखात बळ आलेल्या पिलांना लहानपणीची आठवणीची पत्रं येत असतील का ?
मला या पाखरांनी भूरळ घातलेली. त्यांची शेकडो घरटी पाहिली. घरट्यासाठी लागणारं गवत इथं मुबलक मिळतं. काही मीटर परिसरात एखादी सुगरण किंवा अनेक सुगरणी यांनी गवतावर हक्क सांगितलेला. जवळच्या झाडाला घरटी विणत. गवत खुडताना मानेला हिसका देत. एका पात्याचे दोन भाग करून घेऊन जात. घरट्याचं निरिक्षण करताना 'तिची इलूशीच चोच, तेच दात तेच ओठ' या ओळी आठवायच्या. मी काही सुगरण पक्ष्याला नावंही दिलेली. ती फक्त त्यांच्या विणीच्या हंगामापुरतीच.
सायंकाळची वेळ. सुगरणी जणू गवताचे भारे घेऊन जाणाऱ्या स्त्रियाच वाटत. त्यांची लगबग किती वाढलेली! गवताची पाती भरभर घेऊन जात. काही सुगरणी उसाच्या शेतात भटकत. उसाची पाती गवतापेक्षाही लांब असत. त्या पात्यावर बसून चोचीत लहानसा भाग घेऊन हवेत भरारी घेत. तशी उसाची पाती धागा उसवल्यासारखंच उसवत जायची. तेव्हा ही सुगरण ठिपकेवाली मनोलीच वाटते. मला वाटतं गवताच्या पात्याला हा एक पर्याय असावा. उसाच्या शेतातून गेलेल्या विजेच्या ताराला लटकलेली घरटी पाहून आश्चर्य वाटतं. त्या घरट्यासाठी फक्त उसाच्या पात्याचाच वापर केला जाई. तारेला गाठ मारणे किती अवघड! घरट्याचा हिरवट रंग पांढरट व्हायचा. कारण वरची बाजू वाळत चाललेली दिसायची.
अर्धवट विणलेल्या घरट्यातून सुगरण वयात आलेल्या मुलीसारखी चोरून पाहते. खरं तर तो नर असतो. अनेक सुगरणी (मादी) घोळक्याने येत असत. त्या नरासह घरट्याचाही स्वीकार करत. पक्षीविज्ञानातील हा स्वयंवर सोहळाच म्हणावा लागेल. जिथं नर निवडण्याचं स्वातंत्र्य मादीला असतं. 'कांडीमार', 'लांडोर', 'चाष' अशा पक्ष्यांच्या विणीच्या हंगामातील नोंदी खूप महत्त्वाच्या वाटतात. त्या अर्धवट विणलेल्या घरट्यातून डोकावणारा नर कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करायचो. वाढलेल्या गवतात लपून त्याच्यावर नजर फिरविली आणि फोटो घेतला. त्यासाठी दोन तासाची मेहनत करावी लागली.
सुगरण पक्ष्याला 'पिवळी चिमणी' म्हणूनही ओळखले जाते. लोहरा गावातील निसर्गप्रेमी शेतकरी 'श्री विठ्ठलराव गणपतराव जाधव' यांनी या पक्ष्याला 'चिगा' हे नाव दिलेलं. हे नाव ऐकून नवल वाटलं. विचारांचा भाला खूप दूरपर्यंत फेकूनही अचूक ठिकाणी पोहोचलाच नाही. चिट् चिट् चिट् या आवाजाचा अपभ्रंश होऊन 'चिगा' असं ऐकू येत असावं असं मला वाटतं. परंतु ते लहानपणापासून 'चिग्याचा खोपा' म्हणूनच ओळखतात.
मी अगोदर म्हटल्याप्रमाणं काही सुगरण पक्ष्याला नावंही दिलेली. एकाच झाडावर घरटी विणणाऱ्या 'सगुणा' आणि 'निर्गुणा' पाहून कुतूहल आणि उत्सुकता शिगेला पोहोचत असे. त्यांच्या मनातील विकार कृतीतून डोकावत असत. निर्गुणा सगुणाच्या घरट्यातील गवताची पाती ओढुन स्वतःच्या घरट्याला लावीत असे. ही एक प्रकारची चोरीच होती. पण दाद कुणाकडं मागायची ? रानपाखरं एकटी राहू लागली की,शिकारी पक्ष्यांचा धोका वाढतो.
काही झाडावरची अर्धवट अवस्थेतील घरटी पाहून अस्वस्थ होतं. विणकाम करणाऱ्या पक्ष्यांचा अंत, जोडीदार न मिळाल्यामुळे पदरी आलेली निराशा, बहुपत्नी विवाहाची तयारी, नैसर्गिक संकटे का अजून काही ? ती घरटी त्यांच्यासारखीच एकटी दिसायची.
जशी घरटी विणताना तिची घाई असायची. तशीच पिलांना भरवताना सुद्धा. पण पिलं पाहता येत नाहीत. काही दिवसांनी घरट्याच्या वरच्या बाजूने छिद्र पाडून पिलं बाहेर येत असावीत का ? पिलं घरट्यातून बाहेर पडली की, सुगरणीचा रंग फिकट होत जातो. 'चिमणी' आणि 'सुगरण' सारख्या दिसू लागत. त्यांच्या आवाजामुळे सहज ओळखू येत.
काही दिवसापूर्वी जपानी लेखक 'ताजीमा शिंजी' यांची अंतर्मुख करणारी 'गाॅडीचा महासागर' नावाची कथा वाचली. खरंतर ही एक रूपक कथाच. त्या कथेतील गाॅडी कासवाचा आणि माशाचा संवाद खूप काही सांगून जातो.
"माणसाची कातडी आणि केस सोलून बाजारात चप्पल, ड्रम, दोऱ्या करून विकल्या तर ? त्यांच्या लहान-लहान मुलांचे कोवळे, लुसलुशीत मांस आणि म्हाताऱ्यांच्या हाडांचे सूप केले तर…. कसे वाटेल रे ! त्यांतही स्त्री आणि पुरुषांचे वेगळे, वेगळे, वजनानुसार…"
सुगरणीची घरटी विकत घेणाऱ्या माणसांना ही रूपक कथा वाचून दाखवावी वाटते. जसा गाॅडी कासवाच्या मनात विचार येतो. तसाच विचार सुगरणीच्या मनातही येत असेलच. मूठभर मास असणाऱ्या रानपाखरांचा कोण विचार करतय ? चिमण्या मारणाऱ्या चीनला नव्यानं चिमण्या विकत घ्याव्या लागल्या हे सर्वश्रुत आहेच.
सुगरण आणि शेतकरी यांचं खूप जवळचं नातं अनुभवता येतं. पिकावर किड आली की, सुगरणी मदतीला येत. विहिरीच्या काठावर वाढलेल्या बोरीबाभळीवर उतरत. सुगरणीसारखे पक्षी पिकाचं 10% नुकसान करत असतील. परंतु कीटक, अळ्या यांच्यामुळं होणारं 50% नुकसान थांबतं हे कळू लागतं. पाखरं हवं तेवढंच खातात. दुसऱ्याला उरावं याचाही विचार करतात. रानातल्या खोपीला कणसं बांधणारा शेतकरी रानपाखरावर तेवढीच माया करतो. सुगरण पिवळी दिसू लागली की, शेतकऱ्याला पिवळ्या अंगानं सासरी जाणारी मुलगी आठवते.
हिवाळ्यात हरभऱ्याच्या शेतात उतरणार्या सुगरणी चिमणीसारख्याच दिसत. त्यांचा गळा आणि पंखांचं दुर्बिणीतून निरीक्षण केल्यावर त्याच्यातलं वेगळेपण जाणवतं. या वेळीसुद्धा ती थव्यानं वावरते. जशी काही काळासाठी झाडावर झुंबरासारखी सुंदर दिसणारी वस्ती असायची. नव्हे ते नव्यानं वसलेलं गाव असायचं. एखाद्या छावणीसारखं. तात्पुरत्या स्वरूपाचं.
सुगरणीच्या घरात तिच्याशिवाय बाईमाणूस दुसरं कोणी नसतं. दिवस भरत आले की, तिच्याही हालचाली मंदावतात. ती स्वतःचं बाळंतपण स्वतः करते. अंडी उबवते. पिलांना भरवते. मानवी जीवन आणि पाखरांचे जीवन यात साम्यपणा असतोच. तो डोळसपणे अनुभवता येतो. 'धनेश' पक्ष्याची मादी स्वतःला ढोलीत कोंडून घेते. काही महिने ती बंदिवासात राहते. नर तिला रसाळ फळं खाऊ घालतो. एखाद्या पुरुषासारखीच. पाखरांचे भावविश्व मानवी जीवनात संक्रमण होताना पाहायला मिळते.
विद्यापिठ परिसरात विहिरीच्या काठावर वाढलेल्या कडुलिंबाच्या झाडावर 41 घरटी पाहायला मिळाली. जणू महानगरातील वस्तीच! तिथं चोरीचं प्रमाणही अधिक होतं. अगदी शहरातल्या सारखच. ती घरटी वेगवेगळ्या टप्प्यावर होती. सात घरट्यांचं विणकाम अर्धवट झालेलं. बाकीची घरटी पूर्णत्वास गेलेली. कडुलिंबाशेजारी काही टाकळणीची झाडं विस्तारलेली. माळावर जशी दुमजली घरटी दिसायची. कुतूहल वाटायचं. परंतु या झाडांवर आगळं-वेगळं घरटं अनुभवता आलं. दोन घरट्याचं मिळून एकच घरटं विणलेलं. स्वतंत्र दोन प्रवेशद्वार असलेलं. आतमध्ये स्वतंत्र समोरासमोर दोन खोल्यांची जागा. सुगरण आणि तिची पिलं त्या बंगल्यात मोकळा श्वास घ्यायची. एखाद्या कॉलनीत कुणाचंतरी घर टुमदार दिसावं. अगदी तसंच दृश्य या सुगरणीच्या कॉलनीत पाहायला मिळत होतं.
काही सुगरणी विणकामात गुंतलेल्या. काही पिलांना भरविण्यासाठी हिरव्या रंगाच्या अळ्या घेऊन येत. जवळच्या झाडावर उतरत. काही वेळानंतर घरट्यात प्रवेश करत. इतरांचा किती गलका असायचा ! कधी-कधी वाटायचं नळावर भांडणार्या स्त्रिया तर नव्हे ! तासन्तास गवतात बसून त्यांच्या आवाजाचा अभ्यास करावा वाटे.
जवळच्या झाडावर विसावलेल्या दोन सुगरणी किती हळुवार बोलत ! पंखांची उघडझाप करणाऱ्या सुगरणीचा आवाज वाढत चाललेला. चोरी करणाऱ्या सुगरणीला पाहून किती त्वेषानं पाठलाग करायची ! तिचा आवाज प्रचंड वाढलेला. रागात आलेल्या माणसासारखाच. बाळाला खाऊ घेऊन येणाऱ्या सुगरणीच्या आवाजातील प्रेमळपणा स्पष्ट जाणवायचा. सहसा तिला कुणी अडथळा करत नसे. पदराआड बाळाला अमृत पाजणार्या माय-माऊली सारखा. लहानपणापासून मामाच्या गावाला जावसं वाटे. अगदी तसंच या सुगरणीच्या गावाला दररोज भेट द्यावी वाटे.
विणीचा हंगाम संपल्यानंतर काही घरट्यांचं निरीक्षण केलं. जिथं सुगरण पिलांना भरवते त्याच्या वरच्या बाजूला थोडासा चिखल वाळलेला चिकटून होता. त्यावर कीटक अडकलेले. त्याचं उत्तर मिळालं नाही. सुगरणी ती वस्ती सोडून कधीच निघून गेलेल्या. त्यांची पिलंही मोठी झालेली. नव्या जोड्या, नवा संसार पाहण्यासाठी पुन्हा एकदा पावसाची वाट पहात घराकडे वळालो. पण या रानपाखराचे विचार उसळी घेऊन मनात डोकावत.
अंगावर भंडारा उधळून घेणाऱ्या सुगरणीला पाहण्यासाठी माझ्या डोळ्यातील सगळी घाण निघून जाऊ दे. तिच्या घरट्याला गवताची काडी-काडी मिळू दे. हर एक घरट्यातून पिलांचा चिवचिवाट कानी पडू दे. तिच्या बाळासाठी झाडांच्या फांद्या अंगण होऊन रांगण्यासाठी मिळू दे. आकाश कवेत घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ येवू दे. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा ही घरटी पाहण्यासाठी, माझे पाय आपोआप रानवाटेकडे वळू दे. हे ईश्वरा एवढं दान पदरात टाक.
माणिक पुरी
परभणी
मो.9881967346
Nice 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete